पुण्यात टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घरासमोरील रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याला मज्जाव करणाऱ्या दाम्पत्यावर कोयत्याने वार केले. ही घटना वानवडीतील महम्मदवाडी परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. टोळक्याने परिसरातील दहा वाहनांची तोडफोड करून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी उद्धव एडके (वय-२६ रा. साठेनगर, तरवडे वस्ती, महम्मदवाडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साठेनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्याच्या आवाजाने जाग येऊन उद्धव आणि त्यांचे आई-वडील घराबाहेर आले. त्यांनी आमची गाडी फोडू नका असे सांगितले. याचा राग आल्याने टोळक्याने फिर्यादी आणि त्यांच्या आई-वडिलांवर लोखंडी कोयत्याने वार केले.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. टोळक्याने परिसरातील रस्त्यावर लावलेले पाच दुचाकी, एक टेम्पाे, दोन रिक्षा, दोन कार यांची तोडफोड केली. तोडफोड केल्यानंतर टोळक्याने आरडाओरडा करीत, कोयते फिरवून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बी.डी. कांबळे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त