Coronavirus : पोलीस दलातील संसर्गात घट, प्रशासकीय विभागाचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना राज्यातील पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी कोरोना संक्रमित होत असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली होती. मात्र आता प्रशासकीय विभागाने दावा केला आहे की, गेल्या काही आठवड्यात पोलीस दलातील कोरोना संक्रमणाचा दर वेगाने घटला आहे. हा दर 13 वरून 24 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पुढील आठवड्यात बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असेल असा अंदाज मुंबई पोलीस दलाच्या प्रशासकीय विभागाने केला आहे.

मागील तीन महिन्यांपासून पोलीस दलात कोरोनाचा फैलाव होत आहे. पोलीस दलात पसरलेला संसर्ग, मृत्यू झालेल्यांसह कोरोनावर मात करणाऱ्यांचा वयोगट, पूर्वीचे आजार, संसर्ग होण्याचे ठिकाण, शहरातील विविध भागांमधील तुलनात्मक आकडेवारी आदींचे विश्लेषण करून प्रशासकीय विभागाने तयार केलेल्या तपशीलवार अहवालातून ही बाब समोर आली आहे.

प्रशासकीय विभागाच्या अहवालानुसार, देशात 2.97, राज्यात 4.49, मुंबईत 5.84 टक्के मृत्यू दर आहे. मुंबई पोलीस दलात 1 जुलै पर्यंत 2821 अधिकारी, अंमलदार कोरोना बाधित झाले. यापैकी 2222 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 38 जणांचा कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्यू झाला असून हा दर 1.34 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

पहिल्या आठवड्यात पोलीस दलातील तिघांना संसर्ग झाला. 13 व्या आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या 2821 पर्यंत पोहचली. पाचव्या आणि नव्या आठवड्यात 1525 पोलीस बाधीत झाले. परंतु त्यांनंतर संक्रमित होण्याचे प्रमाण कमी झाले आणि कोरोनावर मात करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णवाढीचा दर वेगाने खाली आहे, असे या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे. 15 व्या आठवड्यात हा दर 10 टक्क्यांवर येईल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

पोलीस दलात झालेल्या मृत्यूंपैकी 31 जण पन्नाशी ओलांडलेले होते. लागण झालेले सर्वाधिक 31 ते 40 या वयोगटातील आहेत. या विश्लेषणानुसार 20-30 वयोगटातील 775, 31-40 वयोगटातील 930, 40 ते 50 वयोगटातील 612 तर पन्नासच्या पुढील 480 अधिकारी, अंमलदार कोरोना बाधित आहेत. तसेच पोलीस दलाचा सशस्त्र विभाग सर्वाधिक प्रभावित आहे. या विभागात 785, पश्चिम प्रादेशिक विभागात 372, दक्षिण विभागात 341, धारावी-वरळी कोळीवाडा या सर्वात प्रभावित वस्त्या मोडणारा मध्य प्रादेशिक विभागात 323 तर नव्याने लॉकडाऊन जारी करण्यात आलेल्या दहिसर, बोरिवली, कांदिवली ही उपनगरे मोडणाऱ्या उत्तर प्रादेशिक विभागातील 211 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like