आक्टोबरमध्ये GST कलेक्शन 1 लाख कोटी रूपयांच्या पुढं, 80 लाख GSTR-3B रिटर्न्स झाले फाईल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यावर्षी फेब्रुवारीनंतर प्रथमच ऑक्टोबर महिन्यात एकूण जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,05,155 कोटींच्या पातळीवर पोहोचले आहे. त्यापैकी 19,193 कोटी रुपये CGST, 25,411 कोटी रुपये SGST आणि 52,540 कोटी रुपये IGST आहेत. IGST मध्ये वस्तूंच्या आयातीमधून 23,375 कोटी वसूल केले आहेत. सेस म्हणून 8,011 कोटी रुपये जमा झाले असून त्यापैकी 932 कोटी रुपये आयात मालावर लावलेल्या सेसमधून वसूल करण्यात आले आहेत.

31 ऑक्टोबरपर्यंत दाखल झालेल्या GSTR-3B रिटर्न्सची एकूण संख्या जवळपास 80 लाखांवर पोहोचली आहे. आयजीएसटी पैकी सरकारने 25,091 कोटी रुपयांचे सीजीएसटी आणि 19,427 कोटी रुपयांचे एसजीएसटी रेग्युलर सेटलमेंट म्हणून दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यात पैसे भरल्यानंतर केंद्र सरकारच्या समभागातील सेटलमेंटची एकूण रक्कम 44,285 कोटी रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर राज्य हिस्सा म्हणून म्हणजे एसजीएसटी म्हणून 44,839 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

अर्थव्यवस्थेचा रुळावर येण्याची चिन्हे
गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबरमध्ये जीएसटीच्या एकूण महसुलात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यात आयातीतून मिळणारा महसूल 9% जास्त झाला आहे. देशांतर्गत स्तरावरील व्यवहारांच्या आधारे जीएसटीच्या महसुलात 11 टक्के वाढ झाली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेत जीएसटी महसूलची वाढ अनुक्रमे – 14%, -8% आणि 5% झाली आहे. या आकड्यांवरून असे गृहीत धरले जाऊ शकते की अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे.

या राज्यांमध्ये सर्वाधिक जीएसटी कलेक्शन :
ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्रातील जीएसटी संकलन सर्वाधिक 15,799 कोटी रुपये होते. यानंतर कर्नाटकमध्ये 6.998 कोटी, तामिळनाडूमध्ये 6,901 कोटी आणि यूपीमध्ये 5,471 कोटी रुपयांचे जीएसटी कलेक्शन आहे. ऑक्टोबर 2019 च्या तुलनेत ऑक्टोबर 2020 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये 21%, हिमाचल प्रदेशात 3%, पंजाबमध्ये 16%, उत्तराखंडमध्ये 10%, हरियाणामध्ये 19%, राजस्थानात 22%, यूपीमध्ये 7%, बिहारमध्ये 7%, पश्चिम बंगालमध्ये 15%, झारखंडमध्ये 23 %, छत्तीसगडमध्ये 26%, मध्यप्रदेशमध्ये 17% आणि गुजरातमध्ये 15 % जास्त जीएसटी संग्रह करण्यात आला. तर दिल्लीमध्ये जीएसटीचे 8 टक्के कमी कलेक्शन झाले.

कशी वाढली जीएसटी वसुली ?
जीएसटीमध्ये ही वाढ झाली आहे कारण सरकार अनलॉक प्रक्रियेअंतर्गत अनेक सवलती देत आहे. यामुळे आर्थिक क्रियाकलापांनाही वेग आला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापारही सुरू झाला आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, जीएसटीच्या महसुलात वाढ होण्याचा अर्थ असा आहे की आता व्यवसायातील दृष्टीकोन सुधारला आहे.