GST : 20 सप्टेंबरला कौन्सिलची बैठक, ‘या’ दैनंदिन जीवनातील गोष्टी होणार ‘स्वस्त’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीएसटी कौन्सिलची 37 वी बैठक हि 20 सप्टेंबरला गोव्यात पार पडणार आहे. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यामध्ये जीवनावश्यक वस्तूंवरील करसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. जर हा निर्णय झाला तर सर्व वस्तूंचे दर कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी होणाऱ्या बैठकीत 5 टक्क्यांच्या स्लॅब ऐवजी 8 टक्क्यांचा स्लॅब हा सर्वात खालचा स्लॅब असणार आहे.

GST कौन्सिलची बैठक
एका इंग्रजी वर्तमानपत्रात आलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार देशाच्या घसरत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जीएसटीच्या दरांमध्ये कपात करण्याची शक्यता आहे.  या संदर्भात एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार असून मागील वेळी झालेल्या बैठकीत वाहनांवरील जीएसटी कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली होती.

बिस्किटे होऊ शकतात स्वस्त
बिस्कीट कंपनीनी देखील जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. सध्या बिस्किटांवर 18 टक्के जिएसटी घेतला जात आहे.

वाहननिर्मिती क्षेत्रात देखील मागणी
सध्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. त्यामुळे यामध्ये घट करून ती 18 टक्क्यांवर आणण्याची मागणी वाहन कंपन्यांनी केली आहे. यामुळे गाड्यांच्या किमती कमी होऊन विक्रीमध्ये देखील वाढ होईल. यासंदर्भात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे.