GST E Way Bill : ट्रक-टेम्पो चालक आणि मालकांनो आता दिवसभरात 200 KM रनिंग करावचं लागणार, अन्यथा…

पोलिसनामा ऑनलाईन – वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधील ई वे बिल प्रणालीत (GST E Way Bill System) मोठा बदल करण्यात आला आहे. यात आधीचे 100 किमीचे अंतर आता दुपटीनं वाढवण्यात आल्यानं वाहनचालकांना त्रासदायक ठरणार आहे. कारण त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर जुने ई वे बिलाची व्हॅलिडिटी संपणार आहे. यामुळं एकदा का वाहन निघालं आणि 24 तासात 200 किमीचं अंतर कापलं नाही तर मोठा दंड भरावा लागणार आहे.

1 जानेवारीपासून ई वे बिल प्रणालीत केलेला बदल लागू झाला आहे. त्यापूर्वी ई वे बिल हे 100 किलोमीटर प्रतिदिन प्रमाणं तयार केलं जात होतं. त्यामुळं प्रत्येक 100 किमीला एक दिवस वाढत जात असे. परंतु आता नव्या नियमानुसार मात्र 100 ऐवजी 200 किमी प्रतिदिन असं अंतर देण्यात आलं आहे. 1000 किमीसाठी या नियमानुसार 5 दिवस मिळत असून त्याचा कालावधी संपला तर ऑनलाईन त्याचा कालावधी वाढवण्यात येत आहे. खास बात अशी की, या तरतुदीमुळं गैरप्रकारांना आळा बसला तरी यामुळं ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मात्र अडचणीत आला आहे.

जर मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक किंवा टेम्पोमध्ये एकाच मालकाचा माल असेल तर हे शक्य होईल, परंतु जर अनेक दुकानदारांचा माल असेल तर त्यांच्यापर्यंत पोहच करणं आणि तिथून निघणं यासाठी खूप वेळ लागतो. कारण वाहतूक कोंडी, बाजारपेठेत दिवसाची नो एन्ट्री, रात्रीची डिलीव्हरी केली तर दुकान बंद असणं, मालकाला बोलवून आणणं, त्यासाठी वेळ लागणं आदी गोष्टी खूप वेळखाऊ आहेत. असं सगळं असताना 24 तासात 200 किमीची अट ही खूप अडचणीची आहे. फक्त ट्रान्सपोर्ट व्यावसायिकच नाही तर उद्योजकांनाही याचा फटका बसतो आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे रस्ता खराब असतो, त्यातही पुन्हा वाहतूक कोंडी असं सगळं असताना 24 तासात 200 किमी अंतर खूप अशक्यप्राय गोष्ट आहे. जर यासाठी घाई केली तर पुन्हा काही अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता आहे.

ई वे बिल कसं काम करतं ?

माल वाहतूकदारांसाठी जीएसटी कायद्यात ई वेल बिल ही संकल्पना आहे. त्या अंतर्गत एखाद्या ठिकाणाहून सामान घेऊन माल ट्रक किंवा टेम्पो निघाला की, ते वाहन कुठल्या प्रकारचं, किती सामान, कुठे जाार याची ऑनलाईन नोंद करावी लागते. त्याआधारे जीएसटी विभागाकडून ई वे बिल दिलं जातं. हे बिल घेऊन वाहन चालकाला प्रवास करावा लागतो. हे वाहन जीएसटी विभागाच्या गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी रस्त्यात कुठेही अडवू शकतात. त्यावेळी ई वे बिल दाखवणं अनिवार्य आहे. 24 तासात वाहन ठरलेल्या ठिकाणी पोहचलं नाही तर ई वे बिल रद्द होतं. पुन्हा परतावाही जातो आणि दुप्पट दंडही द्यावा लागतो.