मोबाईल होणार महाग, GST 12 % वरून 18% करण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने शनिवारी मोबाइलवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी 12 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. परंतु आता 6 टक्के जिएसटी वाढवण्यात आल्याने मोबाइलवर 18 टक्के जीएसटी आकरण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाइलच्या किंमती वाढणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोबाइलवरील जीएसटी वाढवण्यात आला असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे नवीन मोबाइल खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

शनिवारी जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीमध्ये मोबाइलवरील जीएसटी 12 टक्क्यावरून 18 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोबाईल फोन आणि मोबाइलच्या खास अन्य उपकरणावरील जीएसटी 12 टक्क्यावरून 18 करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सीतारामण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जीएसटी वाढल्याने मोबाइलच्या किंमतीही वाढणार आहेत. याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

अनेक संघटनांचा विरोध
केंद्राच्या या निर्णयाला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. कॅट आणि ऑल इंडिया मोबाइल रिटेलर असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्रही पाठवले आहे. या पत्रामध्ये मोबाइलवर जीएसटी न वाढवण्याची मागणी केली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जीएसटीमध्ये वाढ केल्यास मोबाइल ग्राहक आणि रिटेलर व्यावसायिकांवर प्रभाव पडेल असे संघटनांचे म्हणणे आहे. तरी देखील केंद्राने जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्राचे आणखी निर्णय
हाताने आणि मशीनने बनवलेल्या काडीपेटीवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच विमानांची देखरेख, दुरुस्ती आणि अन्य सेवांवरील जीएसटी 18 टक्क्यावरून 5 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.