‘INS SHIVAJI’ मध्ये अंडरट्रेनी १९ वर्षीय नाविकाची आत्महत्या

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन – लोणावळ्यातील नेव्हीच्या INS SHIVAJI या ट्रेनिंग सेंटरमध्ये अंडरट्रेनी असलेल्या १९ वर्षीय नाविकाचा मृतदेह सिलींग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आकाश साईनाथ कन्नाल (वय १९ रा. गंगा ब्लॉक आयएनएस शिवाजी, लोणावळा, मुळ तेलंगणा) असे त्याचे नाव आहे.

आकाश कन्नाल हा आयएनएस शिवाजीवरील गंगा ब्लॉक येथे मंगळवारी गार्ड ड्यूटीवर होता. त्यावेळी तो बराच वेळ परतला नाही. गार्ड ड्यूटी तपासणाऱ्या मुकेश कुमार यांनी चौकशी केली तेव्हा त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी तो शेजारीच असलेल्या मनोरंजन हॉलमध्ये पंख्याला एका पांढऱ्या रंगाच्या बेडशिटने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मुकेशकुमार आणि इतरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्याला रुग्णालायात दाखल करण्यात आले मात्र तो उपचारापुर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राधिका मुंडे करत आहेत.

आकाश कन्नाल हा मुळचा तेलंगणा राज्यातील निर्मल तालुक्यातील पार्डी गावचा आहे.