‘कोरोना’च्या रूग्णांना वेळेवर उपचार द्या, अजित पवारांच्या अधिकार्‍यांना सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’संदर्भातील उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी दोन्ही महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’ संसर्गित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत अजित पवारांनी समाधान व्यक्त केलं. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’ रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढलं आहे, ही समाधानाची बाब आहे. पण कोरोना प्रसार रोखण्यासोबत संसर्गित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याची दक्षता घ्यावी. तसेच, कोरोना बाबतची भीती घालवण्यासाठी, जनसामान्यांमध्ये सतर्कता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती मिळण्यासाठी छोट्या-छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. कोरोना रुग्णांना उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करण्यात येत आहे. शासनाने ही सर्वात मोठी सुविधा उपलब्ध केली आहे.

प्लाझ्मा दान करण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश त्यांनी दिले. ‘कोरोना’च्या संकटाशी आपण सर्व जण मिळून विविध माध्यमातून लढा देत आहोत. आपण ही लढाई नक्की जिंकू, अशा विश्वास सुद्धा अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला. तर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आठवडानिहाय कोरोना संसर्गित रुग्ण आणि मृतांचा तपशील, कोरोनातून मुक्त झालेलं रुग्ण, संपर्क शोधणे, नमुना तपासणी प्रयोगशाळा, क्षेत्रनिहाय प्रतिबंधित क्षेत्र, अनुमानित कोरोना रुग्ण आणि नियोजित बेड संख्या, रुग्णवाहिका उपलब्धता याची माहिती दिली. तसेच, जम्बो रुग्णालयात उभारणीचे काम गतीने सुरु असल्याचे त्यांनी म्हटले.