गुडीपाढव्याला पंढरपुरची माऊली सजली चाफ्याच्या फुलांनी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशभरासह राज्यातील अनेक धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. मात्र, गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आणि फळांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 17 मार्चपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन बंद करण्यात आले आहे.

विठूरायाचा पाडवा देखील बंद मंदिरातच होत आहे. परंपरा म्हणून मंदिर समितीने मिळेल त्या फुलांमध्ये विठ्ठल आणि रूक्मिणीचा गाभारा कर्मचार्‍यांकडून सजवून घेतला आहे. कोरोनाच्या भितीमुळे विठ्ठल मंदिर भावीकांसाठी बंद असले तरी देवाचे नित्योपचार प्रथेनुसार मंदीर समिती पुजारी आणि कर्मचारी करत आहेत. पाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असल्याने विठुरायाच्या गाभार्‍यात सोनचाफा, मोगरा आणि इतर सुगंधी फुले, पानांची सजावट करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पंढरपूरचे विठ्ठल मंदीर बंद करण्याचा निर्णय मंदीर समितीने घेतला आहे. देवाच्या प्रसन्नतेतून मानवजातीवरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे ही भावना नक्कीच आहे.

ही मंदीरे आहेत बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील अनेक मंदिरे बंद करण्यात आली आहेत. त्यात तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, नृसिंहवाडीचे दत्त मंदिर, जेजुरीचे खंडोबा मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. तर शिर्डीचे साईबाबा मंदिरही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर गणपतीपुळे, मुंबादेवी, परळी वैद्यनाथ मंदिरंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

You might also like