Gudi Padwa 2021 : गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा, राज्य सरकारची नियमावली जाहीर; प्रभातफेरी, मिरवणूकांना बंदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कडक निर्बंध लागू करूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात क़डक लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली  आहे. दरम्यान मंगळवारी (दि. 13)  साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे.  मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे  यंदा गुढीपाडवा हा घरातच साजरा करावा लागणार आहे. दरम्यान गुढीपाडव्यानिमित्त प्रशासनाच्या पूर्व परवानगीने रक्तदान शिबीर आयोजित करता येणार आहे.

गेल्या वर्षी कोरोना संकटापासून राज्यात आतापर्यंत झालेले सण, उत्सव साधेपणाने एकत्र न जमता साजरे झाले आहेत. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता  गुढीपाडवा हा सण देखील साधेपणाने सकाळी 7  वाजेपासून रात्री 8 वाजण्यापूर्वी साजरा करणे अपेक्षित आहे. राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपारिक वेशभूषा परिधान करुन  तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करुन नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा  पाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, दुचाकी रॅली मिरवणुका काढू नयेत, तसेच सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये असे आवाहन केले आहे.  सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरगुती गुढी उभारुन पाडवा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.