दिल्ली : 7 वर्षांनंतर गुडीया गँगरेप खटल्याचा निर्णय, 2 आरोपी दोषी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या गुडीया सामुहिक बलात्कार प्रकरणाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. दिल्लीच्या करकरदुमा न्यायालयाने दोन्ही आरोपी प्रदीप आणि मनोज यांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने पॉक्सो, अपहरण, सामुहिक बलात्कार आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोघांना दोषी ठरवले आहे. दोषींनी 5 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. 24 तास गुडीया त्यांच्या ताब्यात होती.

हे प्रकरण निर्भया प्रकरणाच्या 4 महीन्यानंतर म्हणजे 15 एप्रिल 2013 ला उघड झाले होते. या दिवशी 5 वर्षांच्या गुडीयाचे 2 जणांनी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. न्यायालय 30 जानेवारीला दोषींच्या शिक्षेवर सुनावणी करणार आहे. दोन्ही दोषींना आता भारतीय दंड विधान कलम 363, 376 आणि 377 अंतर्गत शिक्षा ठोठावली जाईल. दोषींना पॉक्सो कायदा कलम 6 अंतर्गत सुद्धा शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

निर्भयाप्रमाणेच गुडीयावरही अतिशय अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात आला होता. गुडीयाच्या शरीरातून मेणबत्ती आणि काचेचे तुकडेही काढण्यात आले होते. अनेक सर्जरी करून तिला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या प्रकरणी दोन आरोपींना बिहार आणि उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली होती.

आरोपी मनोज शाह आणि प्रदीप दोघेही शेजारी होते. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होण्यास वेळ लागला कारण प्रदीपने आपण अल्पवयीन असल्याचे सांगितले होते. तसेच प्रकरण लांबविण्याचे प्रयत्न करण्यात आले होते.

बलात्कारानंतर केला होता हत्येचा प्रयत्न
गुडीयावर ज्यावेळी अत्याचार झाला, त्यावेळी ती अवघी 5 वर्षांची होती. बलात्कारानंतर दोन्ही आरोपींनी तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 15 एप्रिल 2013 च्या संध्याकाळी गुडीया बेपत्ता झाली आणि 17 एप्रिलला सकाळी सापडली होती. यानंतर उपचारासाठी तिला एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे तिची प्रकृती अनेक दिवस गंभीर होती.

डॉक्टरांनी पीडित मुलीच्या शरीराच्या आतून काचेचे तुकडे आणि मेणबत्ती काढली होती. अनेक दिवस गुडीयाची प्रकृती अत्यंत नाजूक होती. या बलात्कार प्रकरणानंतर लोकांनी आपला संताप व्यक्त केला होता. तसेच पोलीस आणि प्रशासनावर लोकांनी रोष व्यक्त केला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/