प्रार्थनास्थळांवर दर्शनासाठी ‘हे’ आहेत नवीन नियम

पोलिसनामा ऑनलाईन टीम – केंद्र सरकारने अनलॉकडाउन 1.0 जाहीर करत मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली. येत्या आठ जूनपासून काही राज्यांमध्ये मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल खुली होणार आहेत. महाराष्ट्रात मात्र अजूनही मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर आता आपल्याला पूर्वीसारखे बिनधास्तपणे वावरता येणार नाही. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. केंद्र सरकारने त्यादृष्टीने काल संध्याकाळी प्रार्थनास्थळांसाठी काही मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. प्रार्थनास्थळाच्या प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर आणि शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्क्रिनिंगची सुविधा आवश्यक आहे.

आजाराची कुठलीही लक्षण नसणार्‍या तंदुरुस्त व्यक्तीलाच प्रार्थना स्थळाच्या परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याबरोबरच चेहर्‍यावर मास्क बंधनकारक करण्यात आला असून त्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. पोस्टर आणि स्टँण्डीच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या उपायोजनासंदर्भात माहिती देण्यात यावी. प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने पोस्टर/स्टँण्डी ठेवण्यात येण्याची सूचना करण्यात आली आहे.

ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून कोरोना व्हायरस रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? त्याबद्दल जनजागृती करण्यास सांगण्यात आले आहे. प्रार्थनास्थळांमध्ये मुर्ती, पवित्र ग्रंथांना स्पर्श करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मंदिराने कॉमन अंथरी टाळावी त्याऐवजी भाविकांनी स्वत:सोबत येताना अंथरी किंवा कापड आणावे, जे जाताना ते आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात.