सलग ८२ तास क्रिकेट खेळणारा विक्रमवीर क्रिकेटर ‘या’मुळे तुरुंगात

हैद्राबाद : वृत्तसंस्था – २०१६ मध्ये सलग ८२ तास क्रिकेट खेळून गिनिज बुकात झळकलेल्या क्रिकेटपटू बी. नागराजू याला आंध्र प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. बीसीसीआयचे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या नावाने अनेक उद्योगपतींची फसणूक केल्याची तक्रार त्याच्याविरोधात केली होती.

बी. नागराजू याने २०१६ मध्ये सलग ८२ तास क्रिकेट खेळून आपले नाव प्रकाशझोतात आणले होते. तो आंध्र प्रदेशच्या रणजी संघात सहभागी होता. गिनीज बुकमध्ये त्याचं नाव नोंदवलं गेले. परंतु तो आता त्याच्या एकावेगळ्याच प्रतापामुळे चर्चेत आला आहे. त्याने बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या नावाने अनेक उद्योगपतींना गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

नागराजूने ट्रू कॉलरवर आपला मोबाईल क्रमांक एमएसके नागराजू यांच्या नावाने सेव्ह केला होता. त्यानंतर तो प्रसाद यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करत होता. त्याचा वापर करून त्याने एमएसके प्रसाद यांच्या नावाने काही उद्योजकांना ५ लाख रुपयांना गंडा घातला. आपल्या नावाचा गैरवापर कुणीतरी करत आहे. असा संशय प्रसाद यांना आला तेव्हा त्यांनी २५ एप्रिल रोजी विजयवाडा सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानतंर पोलिसांनी याप्रकरणी तपास करून नागराजूला अटक केली.

नागराजूने झटपट रपैसा कमविण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. त्याला यापूर्वीही अटक कऱण्यात आली होती. त्याने तेलगुदेसम पक्षाचे एका मंत्र्‍याचा पीए असल्याचे सांगून पैसे उकळले होते.