पिरियड्स चेक करण्यासाठी मुलींचे जबरदस्तीने अंतर्वस्त्र उतरवणाऱ्या प्राचार्य, हॉस्टेल वॉर्डनसह 4 जणांवर FIR

भुज : वृत्तसंस्था – गुजरातच्या भुज मधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. भूजमधील सहजानंद महाविद्यालयातील मुख्याध्यापकाने 68 विद्यार्थिनींना त्यांचे अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडले तसेच त्यांना मासिक पाळी आली आहे की नाही हे तपासले. या संतापजनक वृत्तानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. मुलीचे कपडे उतरवणाऱ्या प्राचार्य, हॉस्टेल वॉर्डन, दोन मदतनीस यांच्यावर एफआरआय दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

मुलींना कपडे उतरवण्याच्या घटनेवर राष्ट्रीय महिला आयोग समितीने दखल घेतली आहे. आयोगाने या घटनेमुळे संताप व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. ही समिती हॉस्टेलला भेट देणार असून समिती पीडित मुलींशी चर्चा करणार आहे. पीडित मुलींनी कोणालाही न घाबरता समोर येऊन बोलले पाहिजे यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण ?
गुजरातच्या एका स्थानिक मीडिया संस्थेनं ही बातमी प्रकाशित केली होती. या मीडिया संस्थेच्या अहवालानुसार, मुलींना महाविद्यालयात पिरियड्स चालू असताना कोणत्याही विद्यार्थ्याबरोबर किंवा विद्यार्थिनींबरोबर हात मिळवण्याचा किंवा गळाभेट घेण्याची परवानगी नाही. तसेच असा आदेश देखील देण्यात आला आहे की शेजारीच असलेल्या मंदिरात पिरियड्स आलेल्या मुलींनी जायचे नाही. मंदिराच्या बाहेर देखील असा बोर्ड लावण्यात आला आहे. इतकेच नाही तर मुलींना महाविद्यालय आणि मंदिराच्या स्वयंपाकगृहापासून लांबच राहण्यास सांगितले आहे.

श्री सहजानंद महाविद्यालय हे स्वामीनारायण मंदिरातील भक्त मिळून चालवतात. या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की पिरियड्समधून जात असलेल्या मुली महाविद्यालयातील लोकांशी हात मिळवत आहेत. तसेच त्या मंदिरात आणि स्वयंपाकघरात देखील जात आहेत. हे रोखण्यासाठी मुख्याध्यापकांनी महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यांना सोबत घेऊन 68 मुलींचे अंतर्वस्त्रे काढून त्यांची मासिक पाळी सुरू आहे की नाही याची तपासणी केली.

यासाठी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी सर्वात आधी मुलींना वॉशरूममध्ये नेले आणि नंतर त्यांचे कपडे काढून मासिक पाळीची तपासणी केली. एका मुलीने स्थानिक मीडियाला सांगितले की, या महाविद्यालयात बर्‍याचदा असे प्रकार घडत असतात. एका मुलीने तक्रार करत सांगितले की, या घटनेवरून आमच्या आई-वडिलांना भावनिक रूपात ब्लॅकमेल केले जात आहे. त्यांना कॉलेज आणि मंदिराच्या ट्रस्टकडून सांगण्यात येत आहे की पोलिसांना याबद्दल काहीही सांगू नका. जेव्हा स्थानिक मीडिया महाविद्यालय आणि मंदिराच्या महिला विश्वस्त आणि मुख्याध्यापक यांच्याशी बोलण्यासाठी गेली तेव्हा ते लोक उपलब्ध झाले नाहीत. मात्र, दोन विश्वस्तांनी या प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणावर कठोर कारवाई करण्याचे सांगितले आहे.