संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाने गुजरात भाजपसह काँग्रेस संतप्त !

अहमदाबाद : वृत्तसंस्था – सध्या अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. दोघांकडूनही एकमेकांवर जोरदार टीकाटीप्पणी होत आहे. दोघांच्याही समर्थकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. कंगनाच्या वादा दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे गुजरात भाजपसह काँग्रेसही संतप्त झाली आहे.कंगना रणौतवर टीका करताना संजय राऊत यांनी गुजरातचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला होता. राऊत यांच्या याच विधानाला गुजरात भाजपसह काँग्रसनेही जोरदार आक्षेप घेतला आहे.

गुजरातमधील करणी सेनेने तर संजय राऊत यांचा पुतळा जाळला आहे. तर भाजप नेते अल्पेश ठाकोर यांनी संजय राऊत यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिला आहे. सध्या बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. दरम्यान या प्रकरणावरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची धग गुजरातपर्यंत पोहचली आहे. संजय राऊत यांनी अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हटल्यावरून प्रतिक्रिया देताना गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. मनीष दोषी म्हणाले, गुजरात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांची भूमी आहे. येथे अनेक शूरवीर आणि दानवीरांनी जन्म घेतला आहे.

राऊत यांचे हे विधान वैयक्तिक आहे. मात्र, अशी विधाने गुजारात कदापीही खपवून घेणार नाही. दरम्यान, माजी आमदार आणि भाजप नेते अल्पेश ठाकोर यांनी राऊत यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी अहमदाबादची तुलना मिनी पाकिस्तानसोबत करुन गुजरातचा अपमान केला आहे. गुजरात अशी विधाने सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तर करणी सेनेनेही या विधानाविरोधात संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करत राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी केली.