माजी IT अधिकारी आणि BJP नेत्याचा दावा – नोटबंदीच्या वेळी एकट्या सूरतमध्ये झाला होता 2 हजार कोटींचा घोटाळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   काळापैसा रोखण्यासाठी मोदी सरकारने 2016 मध्ये केलेल्या वादग्रस्त नोटबंदीवर आता भाजपा नेता आणि माजी आयटी अधिकारी पीव्हीएस शर्मा यांनी मोठा दावा केला आहे. शर्मा यांनी म्हटले आहे की, पीएम मोदी देशात काळापैसा रोखण्यासाठी 2016 मध्ये नोटबंदी घेऊन आले होते, परंतु गुजरातच्या सूरतमध्ये काळापैसावाल्यांनी आपला काळापैसा सफेद केला. शर्मा यांनी दावा केला आहे की, केवळ सूरतमध्येच नोटबंदी दरम्यान 2 हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला होता. या प्रकरणी प्राप्तीकर अधिकारी, बिल्डर्स, सीए आणि ज्वेलर्सवर आरोप करण्यात आले आहेत.

पीव्हीएस शर्मा यांनी ट्विट करून नोबंदीच्या वेळी बँकांमध्ये जमा कोट्यवधी रूपये आणि मनी लॉन्ड्रिंगद्वारे पैसा बनवण्याचे आरोप काही स्थानिक ज्वेलर्सवर केले आहेत. यासोबतच शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडू संपूर्ण प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून तपास करण्याची मागणी केली आहे. शर्मा यांनी म्हटले, नोटबंदीत झालेल्या भ्रष्टाचारावर काही स्वार्थी तत्वांनी पडदा टाकून ठेवला आहे. अशा तत्वांना उघडले पाडण्याचे पंतप्रधान मोदी यांचे कर्तव्य आहे.

कलामंदिर ज्वेलर्सने दिले स्पष्टीकरण

भाजपा नेत्याच्या या दाव्यानंतर सूरतच्या ज्वेलर्स आणि बिल्डर्समध्ये खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्याच्या दाव्यानंतर कलामंदिर ज्वेलर्सचे मालक मिलन भाई शाह मीडियाच्या समोर आले आणि त्यांनी स्पष्टीकरण दिले. मिलन भाई यांनी म्हटले की, त्यांच्यावर केलेले आरोप निराधार आहेत आणि ते कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत. मिलन शाह म्हणाले, पीव्हीएस एक वादग्रस्त माजी आयटी अधिकारी आहेत, जे ट्विटरवर चोरीचे कागदपत्र पोस्ट करतात, जो एक गुन्हा आहे. आम्ही 2016-17 मध्ये आमच्या कंपनीच्या तुलनेत 12 पट जास्त कर भरला आहे, ज्याची माहिती आरओसीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

त्यांनी शर्मा यांच्यावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, माजी अधिकारी 15 वर्षात का निवृत्त झाले आणि त्यांच्या फ्लॅटची किंमत 10 कोटी रूपयांपेक्षा जास्त कशी आहे. कोणतेही उत्पन्न नसताना हे कसे शक्य आहे? कलामंदिर ज्वेलरी रिटेलमध्ये सर्वात जास्त टॅक्स भरणारी कंपनी आहे. आमच्या कंपनीत 400 लोकांचा स्टाफ आहे. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही.

काँग्रेसने असे म्हटले…

पीव्हीएस शर्मा यांच्या या ट्विटवर काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांचे वक्तव्य आले आहे. मोढवाडिया यांनीसुद्धा एक ट्विट केले आणि सूरतच्या ज्वेलर्स कलामंदिरद्वारे नोटबंदीच्या रात्री 110 कोटी रूपयांचे सोने विकल्याबाबत माहिती दिली.

मोढवाडिया यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आरोप करण्यात आला की, नोटबंदी भाजपाच्या दोस्तांसाठी वरदान आहे. कला मंदिर ज्सेवलर्सने नोटबंदी दरम्यान 110 कोटी रूपये जमा केले आणि आयकर विभागनेत्यांच्यावर अवघा 84 लाख रूपयांचा टॅक्स लावला आणि अशाप्रकारे काळे पैसे सफेद झाले.