राहुल गांधींना कोथिंबीर अन् मेथीमधला फरक तरी कळतो का ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Gujarat chief minister Vijay Rupani) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी कळतो, असा टोला मुख्यमंत्री रुपाणी यांनी लगावला आहे.

मेहसाणा येथे तब्बल 287 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नर्मदा पेयजल योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री रुपाणी बोलत होते. यावेळी रुपाणी यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस ज्या सुधारणांची वकिली करायची आज त्यालाच काँग्रेसकडून विरोध करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे ते म्हणाले. तसेच मी राहुल गांधींना विचारू इच्छितो, तुम्हाला कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का? असा सवाल विचारला आहे.

भाजपचा काँग्रेसवर जोरदार निशाणा
2019 च्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने आम्ही सत्तेत आल्यास एपीएमसी कायद्यामध्ये बदल करू आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ठरलेल्या बाजारपेठांच्या बाहेर शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देऊ. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाच बदल केला आहे, तर काँग्रेस याचा विरोध का करत आहे? असे रुपाणी यांनी म्हटले आहे. तसेच राहुल गांधींनी एका काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी एपीएमसीमधून भाज्या आणि फळांना हटवण्यात यावे, असे केल्यास त्यांच्या किमती कमी होतील, असे मत व्यक्त केले होते. आता शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे, तर काँग्रेस त्याचा विरोध करत आहे. काँग्रेसने अशी भूमिका का घेतली आहे. याचे उत्तर लोकांना हवे आहे, असेही रुपाणी यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानावर भाजपने पलटवार केला आहे. भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात आणि त्यांना तसेच अशोक यांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही, असे राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी म्हटले आहे.