गुजरात निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव; ‘या’ दिग्गज नेत्यांचे राजीनामे

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –  गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांचे निकालही समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला असल्याचे समोर आले. त्यानंतर या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राज्यातील दोन दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांचा समावेश आहे.

गुजरातमधील 81 नगरपालिका, 31 जिल्हा पंचायत आणि 231 तालुका पंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत चावडा यांनी राजीनामा दिला. चावडा यांच्या राजीनाम्यानंतर गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश धनाणी यांनीही राजीनामा दिला आहे. काँग्रेस हायकमांडने या दोघांचे राजीनामे स्वीकारले आहेत. त्यानंतर आता मार्च अखेरपर्यंत काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

प्रदेशाध्यक्ष म्हणून पराभवाची जबाबदारी स्वीकारतो

प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताना अमित चावडा यांनी सांगितले, की प्रदेशाध्यक्ष या नात्याने पराभवाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मी पदाचा राजीनामा पाठवला आहे. राजीनामा दिला असला तरी मी येत्या दिवसात पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने काँग्रेसमध्ये असेन.