Coronavirus : गुजरातमध्ये कोरोनाचं ‘तांडव’ ! फूटा फूटावर जळताहेत चिता, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराठी जागाही नाही शिल्लक

अहमदाबाद: पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन, बेडस् उपलब्ध नाहीत आणि स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नाही असे अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक स्मशानांबाहेर मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी प्रतीक्षा करत थांबावे लागत आहे. सूरत शहरातल्या उमरा भागात एका स्मशानभूमीत दोन दिवसांपूर्वी एकाचवेळी 25 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुजरातमध्ये अहमदाबाद, सूरत सारख्या प्रमुख शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू धर्मात सूर्योदयानंतर अंत्यविधी करत नाहीत. मात्र कोरोना मृतांचा आकडा वाढतच असल्याने अनेक ठिकाणी रात्रीदेखील अंत्यस्कार केले जात आहेत. त्यामुळे शवदाहिन्या अक्षरश: 24 तास सुरू आहेत. सूरत शहरातल्या उमरा भागात एका स्मशानात दोन दिवसांपूर्वी एकाचवेळी 25 जणांना अग्नी दिला गेला. बडोद्यातही रात्रीच्या वेळी मृतदेहांवर अंत्यविधी होत आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि मृतांच्या नातेवाईकांना फार वेळ प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी अधिकाऱ्यांनी लोखंडाच्या चिता तयार केल्या आहेत. अहमदाबादमधल्या काही मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी तब्बल 8 तास वाट पाहावी लागली. गुजरातच्या महत्त्वाच्या शहरांमधील काही स्मशानंभूमी अनेक महिन्यांपासून बंद होती. मात्र आता ती स्मशान सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.