गणेश मंडपात दारू पिऊन धिंगाणा घालणारे 8 जण ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गणेश चतुर्थीनिमित्त बांधलेल्या गणेश मंडपामध्ये गणपतीच्या मूर्तीसमोर उघडपणे दारू पिऊन डान्स करणाऱ्या लोकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पंतप्रधान यांच्या गुजरात मधील सुरत शहरातील आहे याबाबत पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की महिधरपुरा पोलिस ठाण्यातील गोलवाड भागातील एका मंडपातील व्हिडिओच्या आधारे आठही जणांची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरत पोलिसांचे पीआरओ पीएल चौधरी म्हणाले की, गुजरात बंदी कायदा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत असे दिसून आले आहे की काही तरुण गणपतीच्या मूर्तीच्या समोर फिल्मी गाण्यांवर नाचतात आणि गाणे गातात. एवढेच नव्हे तर आरोपी एकमेकांना उघडपणे मद्यपानही करीत आहेत.

गुजरातमध्ये दारू बंदी लागू आहे. असे असूनही, लोकांकडून सरकारच्या या नियमांचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार संपूर्ण सूरतमध्ये 60 हजाराहून अधिक मोठे आणि लहान गणेश मंडळ उभारण्यात आले आहेत.