गुजरातच्या कोविड हॉस्पिटलमध्ये लागली भीषण आग, 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू

अहमदाबाद : वृत्त संस्था – गुजरातच्या भरूचमध्ये एका कोविड हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी उशीरा भीषण आग लागली, ज्यामध्ये किमान 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकजण जखमी सुद्धा झाल्याचे सांगितले जात आहे. ही दुर्घटना भरूचच्या पटेल वेल्फेयर हॉस्पिटलमध्ये रात्री सुमारे 12.30 ते 01 वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या. पटेल वेल्फेयर हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्याला कोरोना रूग्णांसाठी कोविड सेंटर बनवण्यात आले होते.

भरूचचे एसपी राजेंद्रसिंह चुडासामा यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, या हॉस्पिटलमध्ये कोविड वार्डात उपचार घेत असलेल्या 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. त्यांनी शंका व्यक्त केली की, मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. सुमारे 50 लोकांना रेस्क्यू करून त्यांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

चार मजल्यांचे हे हॉस्पिटल भरूच-जंबूसर हायवेवर आहे. हे एका ट्रस्टद्वारे संचालित केले जाते. फायर ऑफिसर शैलेश संसिया यांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर कोविड वॉर्ड आहे. एक तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि फायर फायटर्स आणि स्थानिक लोकांच्या मदतीने किमान 50 लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले, ज्यांच्यावर उपचार सुरू होते.

अधिकार्‍याने सांगितले की, आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. असे सांगितले जात आहे की, हॉस्पिटलमध्ये इतकी भीषण आग लागली होती की, काही वेळातच खुपकाही जळून खाक झाले.