Coronavirus : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी आयुर्वेदिक ‘काढा’, 6 हजार लोकांवर ‘टेस्ट’ केल्याचा ‘या’ सरकारचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध झाले नसून प्रत्येक देश कोरोनावर लस बनवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ असून देशातील कोरोनाबाधितांची संख्या 52 हजाराच्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत 1783 लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये 396 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोनाबाबत गुजरात सरकारने मोठा दावा केला आहे. सरकारकडून सांगण्यात आलं की राज्यात कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक काढा उपयोगी पडत आहे. यानंतर सरकारला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. गुजरातच्या मुख्य सचिव जयंती रवि यांनी गुरुवारी (दि.7) पत्रकार परिषद घेतली. यावेळी माहिती देताना सांगितले की, राज्यात 3585 लोकांना आयुर्वेदिक काढा देण्यात आला आहे. तर 2625 लोकांना होमिओपॅथी औषध देण्यात आले आहे. यातील फक्त 11 लोकांनाच कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यांना कोरोना झाला कारण त्यांनी डोस पूर्ण केला नाही, असंही जयंती रवि यांनी म्हटलं.

गुजरातच्या मुख्य सचिव जयंती रवि यांनी सांगितल्यानुसार, क्वारंटाइन झालेल्या लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा उपाय आहे. त्याचे हे वक्तव्य एका वृत्तवाहिनीच्या ट्विटर हँडलवर आहे. यात म्हटले आहे की, गुजरात सरकारने याबाबत आयुष मंत्रालयाला माहिती दिली आहे. यात क्वारंटाइन झालेल्या 6 हजार लोकांना आयुर्वेद काढा दिला आणि त्याचा फायदाही झाला. ज्या लोकांनी डोस पूर्ण केला त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितलं.