‘देशात क्रिकेटचे सर्वाधिक चाहते गुजरातमध्येच’ – सुनील गावस्कर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गुजरातमधील अहमदाबाद येथे असणाऱ्या मोटेरो स्टेडियमचे नूतनीकरण करून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठ्या या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज पहिलाच भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्यात भारतीय संघानं चांगली कामगिरी केली असून इंग्लंडला ११२ धावांवर ऑल आउट केलं आहे. दरम्यान, पहिल्या सत्रानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या नव्या स्टेडियमबाबत विधान करत म्हंटले कि, “देशात क्रिकेटचे सर्वाधिक चाहते हे गुजरातमध्ये आहेत”.

पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर सुनील गावस्कर यांनी गुजरातमधील क्रिकेट चाहत्यांबाबत वक्तव्य केलं. ते म्हणाले कि, “देशात क्रिकेटचे सर्वाधिक चाहते हे गुजरातमध्येच आहेत. पश्चिम बंगालमध्येही आहेत. पण तिथे फुटबॉलचेही चाहते आहेत. मुंबई मध्येही क्रिकेट चाहत्यांची कमी नाही, पण तिथंही विविध खेळ आहेत. पंजाब आणि उत्तरेकडील राज्यात हॉकीवरचं सर्वाधिक प्रेम पाहायला मिळत. पण गुजरातमध्ये क्रिकेटशिवाय दुसरं काहीच नाही. त्यामुळे इथल्या लोकांसाठी क्रिकेटच सर्वकाही आहे, ज्याचा अनुभव आज मैदानात येतोय”.

दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असणाऱ्या या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्याला जवळपास ५० हजार प्रेक्षक उभे आहेत. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या स्टेडियमचं उदघाटन करण्यात आलं.