गुजरात सरकारला धक्का ! ‘या’ बडया मंत्र्यांची आमदारकी गेली, हाय कोर्टानं निवडणूक केली रद्द

पोलिसनामा ऑनलाइन – गुजरात भाजपचे जेष्ठ नेते आणि कायदामंत्री भूपेंदरसिंह यांना गुजरात उच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. २०१७ च्या निवडणुकीत गैरवर्तणूक आणि फेरफार केल्याच्या आरोपांवरून उच्च न्यायालयानं ढोलका विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवैध ठरवली आहे. त्यामुळं भुपेंदरसिंह चुडामासा यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

भाजपचे उमेदवार असलेले भुपेंदरसिंह चुडासामा २०१७ च्या निवडणुकीत ढोलका मतदारसंघातून ३२७ मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अश्विन राठोड यांचा पराभव केला होता. मात्र, निकालानंतर राठोड यांनी मतमोजणीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. ४२९ बॅलेट मतांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

याप्रकरणी काँग्रेसचे अश्विन राठोड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यात म्हटलं होत की, “भाजपचे आमदार भूपेंदरसिंह चुडामासा यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध ठिकाणी विशेषतः मतमोजणी वेळेस भ्रष्ट वर्तन केलं. तसंच नियमांचं उल्लंघन केलं” असा आरोप राठोड यांनी याचिकेत केला. यावरती न्यायमूर्ती परेश उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होती. मंगळवारी न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल दिला. राठोड यांनी याचिकेत केलेल्या आरोपांचा ठपका ठेवत न्यायालयानं ढोलका मतदारसंघाची निवडणूक रद्द केली.

दरम्यान, उच्च न्यायालायने दिलेल्या निकालाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. “गुजरातच्या कायदा मंत्र्याला बेकायदेशीरपणे विजयी घोषित करण्यात आलं होत. मात्र उच्च न्यायालयानं हा निकाल अवैध ठरवत निवडणूक रद्द केली आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते शक्ती सिंह यांनी व्यक्त केली. तर चुडामासा यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.