संचारबंदीचे उल्लंघन करून महिला कॉन्स्टेबलला धमकी, मंत्र्याच्या मुलाला अटक

सूरत : वृत्त संस्था – लॉकडाउन नियम आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुजरातचे राज्यमंत्री कुमार कनानी यांचा मुलगा आणि त्याच्या दोन मित्रांना रविवारी अटक केली आहे. या तिघांनी महिला कॉन्स्टेबलशी गैरवर्तनही केले होते. त्याचा ऑडिओ आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अटकेनंतर मंत्र्याच्या मुलासह तिघांनाही जामिनावर सोडले आहे.

आरोग्य राज्यमंत्री व वराछा रोड मतदारसंघातील आमदार कुमार कनानी यांचा मुलगा प्रकाश कनानी आणि त्याच्या मित्रांनी महिला कॉन्स्टेबल सुनीता यादव यांच्याशी वाद घातला. या तिघांनी मास्क घातला नाही म्हणून त्यांना यादव यांनी हटकले. या घटनेची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करून मंत्रीपुत्र प्रकाश कनानी याच्यासह तिघांना अटक केली.

‘प्रकाश कनानी आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले,’ अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सी. के. पटेल यांनी दिलीय.

रात्री संचारबंदीच्या काळात काही जणांना रोखले. तर त्यांनी धमकावले, असा आरोप महिला कॉन्स्टेबलने केला होता. त्यानंतर सूरतचे पोलीस आयुक्त आर. बी. ब्रह्मभट्ट यांनी शनिवारी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. पोलीस कॉन्स्टेबल यादव यांनी संचारबंदीच्या काळात लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोघांना रोखले होते.

रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. त्यानंतर त्यांनी प्रकाश कनानी याला बोलावले. तो मंत्री कुमार कनानी यांच्या वाहनातून आला होता. त्यानंतर सुनीता यादव यांच्याशी वाद घातला. या घटनेचा व्हिडिओ व ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘आम्ही ठरवलं तर तुला ३६५ दिवस याच जागी उभं करू शकतो,’ असे मंत्र्यांचा मुलगा प्रकाश कनानी धमकावताना ऑडिओ क्लिपमध्ये रेकॉर्ड झाले आहे.

या धमकीनंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल देखील संतापल्या. तुझ्या वडिलांची गुलाम किंवा नोकर नाही, जे मला इथं ३६५ दिवस उभं करू शकतात, असंही या क्लिपमध्ये आहे. दरम्यान, यादव या आजारपणाच्या सुट्टीवर गेल्या आहेत. या घटनेची चौकशी सुरु आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली. पोलीस कॉन्स्टेबल यादव यांनी राजीनामाही दिल्याचे समजत आहे.