कौतुकास्पद ! महापुरात अडकलेल्या 2 मुलांना वाचवण्यासाठी ‘तो’ पोलिस चालला त्यांना खांद्यावर घेवुन दीड किलोमीटर (व्हिडीओ)

अहमदाबाद : वृत्तसंस्था – महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली प्रमाणे गुजरातच्या मोरबी येथेही महापूर आला आहे. या संकटसमयी आपले कर्तव्य बजावतानाचा एका पोलीस शिपायाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोरबी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या पृथ्वीराज जडेजा यांनी पुरात अडकलेल्या दोन चिमुकल्यांना आपल्या खांद्यावर बसवून पूरातून वाचवले. त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल नेटकऱ्यांनी त्यांना सॅल्यूट केला आहे.

जडेजा दोन मुलींना खांद्यावर बसवून पुराच्या पाण्यातून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओ पाहणाऱ्यांना श्रीकृष्ण मालिकेतील तान्हुल्या कृष्णाला घेऊन जाणाऱ्या वासुदेवाची आठवण झाली. महापूराच्या पाण्यातून वाट काढताना जडेजा यांनी दोन मुलींना खांद्यावरून दीड किलोमीटरचा प्रवास केला. पाण्यातून वाट काढताना ते प्रत्येक पावलागणीस प्रत्येक पाऊल जपून टाकताना दिसत आहेत.

कमरेपर्य़ंत असलेल्या पाण्यातून पोलीस शिपाई जडेजा यांनी दीड किलोमीटरचे अंतर पार केले. सोशल मीडियावर या पोलिसाच्या कर्तव्यदक्षतेला सलाम ठोकला जात आहे. तर काहीजण त्यांचे कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्विट करून पोलीस शिपाई पृथ्वीराज जडेजा यांचे कौतुक केले आहे.

यानंतर गुजरात पोलिसांचे अतिरिक्त पोलीस महासंचालक शमशेर सिंह यांनी आपल्या ट्विटरवर जडेजाचा मुलांना वाचवितानाचा एक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला आहे. जडेजा यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांनी कौतुकही केले आहे. आणि “आमचे खांदे तुमचे सौरक्षण” असा संदेश लिहिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त