गुजरातमध्ये काँग्रेसच्या 8 आमदारांच्या राजीनाम्यानंतर हॉटेलमध्ये ठेवले 65 आमदार

अहमदाबाद : राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने आपल्या 65 आमदारांना तीन वेगवेगळ्या रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. जेव्हापासून निवडणुकांची घोषणा झाली आहे, आतापर्यंत काँग्रेसच्या 8 आमदारांनी राजीनामा दिला आहे. 2 दिवस अगोदर काँग्रेसचे कर्जन मतदार संघातील आमदार अक्षय पटेल, करपाडातून जीतू चौधरी आणि मोबीमधून ब्रजेश मेरजा यांनी राजीनामा दिला आहे.

काँग्रेसच्या एका नेत्याने या गोष्टीस दुजोरा दिला की, पक्षाने 65 आमदारांना तीन वेगवेगळ्या रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये ठेवले आहे. पक्षांच्या सूत्रांनी सांगितले की, 40 आमदारांना राजकोटच्या नील सिटी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे आणि अन्य आमदारांना राजस्थानच्या वाइल्ड विंड्स आणि वडोदराच्या एका फार्म हाऊसमध्ये ठेवले गेले आहे.

नील सिटी हॉटेलचे मालक काँग्रेस नेते इंद्रनील राजगुरु आहेत, ज्यांनी 2017 मध्ये विजय रूपाणी यांच्याविरूद्ध विधानसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसकडून हे पाऊल तेव्हा उचलण्यात आले जेव्हा असे वृत्त होते की, 19 जूनपूर्वी काँग्रेसचे आणखी दोन आमदार आपला राजीनामा देऊ शकतात.

गुजरातमध्ये काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता जयराजसिंह परमार यांनी म्हटले की, हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये थांबलेल्या आमदारांवर बाहेर जाण्याबाबत कोणताही प्रतिबंध नाही. परंतु, हे पाऊल यासाठी उचलण्यात आले की, भाजपाने काँग्रेस आमादारांच्या बाबतीत बळाचा वापर करू नये. हॉटेलमध्ये आमदारांना राज्यसभा निवडणुकीबाबत प्रशिक्षण देण्यात येईल आणि मतदान कसे करावे हे सांगितले जाईल.

कोरोना महामारीदरम्यान काँग्रेसने उचललेल्या या पावलावरून टीका होत आहे. कारण, हॉटेलमध्ये उपस्थित कोणत्याही आमदाराने मास्क घातलेला नाही. परंतु भाजपाने काँग्रेसच्या या कृतीला काँग्रेसचे अंतर्गत प्रकरण म्हणत टाळले आहे. आमदारांच्या राजीनाम्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष जीतू वघानी म्हणाले, केवळ गुजरातची जनताच नव्हे तर आमदार सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नाहीत.