आणखी एका काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, राज्यसभा निवडणूकीपुर्वी 8 जणांनी सोडली ‘साथ’

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरातमधील राज्यसभा निवडणुका जाहीर झाल्या असून गुजरातमध्ये 19 जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या 7 आमदारांनी यापूर्वी आपले राजीनामे दिले असून काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. आतापर्यंत 8 आमदारांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. यापूर्वी तीन आमदारांनी राजीनामा दिला होता. यामध्ये कर्झन येथील अक्षय पटेल, कप्रडा येथील जीतू चौधरी आणि मोरबी येथील ब्रिजेश मेरजा यांनी राजीनामा दिला आहे. ब्रिजेश मेरजा यांनी आज (शुक्रवार) सभापतींकडे आपला राजीनामा सादर केला आहे.

राज्यसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला. गड्डा येथील प्रवीण मारू, लिंबडी येथील सोमा पटेल, अब्दासा येथील पद्मम्नसिंग जडेजा, धारी येथील जे.व्ही. काकडिया आणि दांग येथील मंगल गावित यांनी राजीनामा सादर केला होता. तर काल आमदार अक्षय पटेल आणि जितू चौधरी या दोन आमदारांनी राजीनामा दिला होता.

गुजरातचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी काल सांगितले होते की, बुधवारी संध्याकाळी दोन्ही काँग्रेसचे आमदार राजीनामा घेऊन माझ्याकडे आले. मी त्यांची पडताळणी केली. त्यांनी मास्क घातले होते त्यामुळे त्यांना मास्क काढण्यास सांगून त्यांचे चेहरे पाहून त्यांची ओळख पटवून घेतली. त्यानंतर त्यांचा राजीनामा मी स्विकारला असून आता ते सभागृहाचे सदस्य राहिलेले नाहीत.

काँग्रेसचे दोन उमेदवार रिंगणात
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने शक्तीसिंह गोहिल आणि भरतसिंग सोलंकी या दोन उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. गोहिल यांना पहिल्या पसंतीची मते मिळतील आणि ते राज्यसभेवर निवडून जातील याची खात्री आहे. परंतु भरतसिंग सोलंकी यांच्यावर विजयावर टांगती तलवार आहे. आता मतांची जुळवाजुळव करूनच ते विजयी होऊ शकतात.

आमदारांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोडवाडिया म्हणाले की, भाजप आमच्या आमदारांना पैशांचे अमिष दाखवत आहे. तसेच ते आमच्या आमदारांना धमकावत आहेत. अक्षय पटेल हे खाणकाम व्यवसायिक आहेत. यासाठी त्यांना अमिष दाखवण्यात आले आहे.