Coronavirus : गुजरातमध्ये एका दिवसात 19 जणांचा मृत्यू तर 226 नवे रुग्ण, अहमदाबादमध्ये सर्वाधिक 164 ‘कोरोना’बाधित

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये मंगळवारी (दि.28) दिवसभरात कोरनाची 226 नवीन प्रकरणे समोर आली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3774 वर पोहचली आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, मागील 24 तासात 19 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 181 झाली आहे.

राज्यात कोरोनाचे नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अहमदाबादमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अहमदाबादमध्ये 164 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर वडोदरा येथे 15 आणि सुरतमध्ये 14 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव जयंत राव यांनी सांगितले की, अहमदाबादमधून कोरनामुळे आणखी 19 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथील महानगरपालिका संचलित एसव्हीपी रुग्णालयातील तीन डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिला. अहमदाबाद शहर आयुक्त विजय नेहरा यांनी सांगितले की, या प्रकरणात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

नेहरा यांनी सांगितले की, कोरोना रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांना कोरोना विषाणूचा धोका अधिक असल्याचे प्रमाण जास्त आहे. आधीपासूनच अंदाज होता की यामध्ये काही डॉक्टरांना कोरोनाची लागण होऊ शकते. खबरदारी म्हणून एसव्हीपी रुग्णालयाच्या इतर डॉक्टरांचे नमुने घेण्यात आले आहेत.