गुजरात दंगलीचा अंतिम अहवाल विधानसभेत सादर, PM नरेंद्र मोदींना क्लीन चिट

गांधीनगर : वृत्तसंस्था – 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी नानावती-मेहता आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्लीन चिट दिली आहे. गुजरातमधील गोध्रामध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीबाबतच्या नानावती-मेहता आयोगाचा अहवालाचा दुसरा भाग आज विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालाचा पहिला भाग 2008 साली सादर केला गेला होता.

27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रामधील साबरमती एक्स्प्रेसमध्ये 59 कारसेवकांना जाळल्याबद्दल गुजरातमध्ये दंगल उसळली होती. याचा तपास करण्यासाठी मार्च 2002  रोजी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी.टी. नानावती यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला होता. न्यायमूर्ती केजी शाह हे आयोगाचे दुसरे सदस्य होते. 2009 मध्ये शाह यांच्या निधनानंतर अक्षय मेहता यांना सदस्य करण्यात आले.

प्रारंभी आयोगाला साबरमती एक्स्प्रेसमधील जाळपोळ संबंधित तथ्य व घटनांची चौकशी करण्याचे काम देण्यात आले होते. परंतु जून 2002 मध्ये गोध्रा घटनेनंतर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासही आयोगास सांगितले गेले होते. यापूर्वी सादर केलेल्या अहवालात आयोगाने साबरमती एक्स्प्रेसच्या बोगी नंबर सहाला आग लावण्याचा नियोजित कट असल्याचे सांगितले होते.

Visit : policenama.com