CAA : PM मोदींना अभिनंदनाचं पत्र लिहा अन्यथा इंटर्नलचे गुण विसरा; गुजरातमधील शाळा वादात

अहमदाबाद : वृत्तसंस्था – भाजपा समर्थकांचा आक्रमकपणा सोशल मीडियासह सर्वत्र दिसत असतानाच आता यामध्ये शैक्षणिक संस्थाही मागे नसल्याचे दिसून आले आहे. गुजरातमधील एका शाळेने मुलांना सीएए कायद्यासाठी मोदींना अभिनंदनपर पत्र लिहिण्याची जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे पत्र लिहिण्यास नकार देणार्‍या विद्यार्थ्यांना इंटर्नल गुण दिले जाणार नाहीत, असेही शाळेने धमकावले होते. यावर पालकांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतर शाळेने माफी मागितली आहे. ही शाळा अहमदाबादमधील असून तिचे नाव लिटिल स्टार असे आहे. शाळेने 5 वी ते 10 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना हे पत्र लिहिण्यास सांगितले होते. पत्रातला मायनासुद्धा शिक्षकांनी फळ्यावर लिहून दिला होता. एका इंग्रजी वर्तमानपत्राने हे वृत्त दिले आहे.

अभिनंदन. मी भारताचा नागरिक म्हणून सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल (सीएए) पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो. माझा आणि माझ्या कुटुंबाचा या कायद्याला पाठिंबा आहे, असा मायना शाळेतील विद्यार्थ्यांना फळ्यावर लिहून देण्यात आला होता. हा मायना पत्राच्या सुरूवातीला टाकून विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहायचे होते, आणि हे पत्र, पंतप्रधान कार्यालय, साऊथ ब्लॉक, सचिवालय इमारत, रायसिना हिल्स, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्यास सांगितले होते.

शाळेच्या या जबरदस्तीला काही विद्यार्थ्यांनी नकार दिल्यानंतर त्यांना इंटर्नलचे गुण न देण्याची धमकी शाळेने दिली, असा आरोप पालकांनी केला आहे. या पत्रावर विद्यार्थ्यांना त्यांचा स्वत:चा पत्तादेखील लिहिण्यास सांगण्यात आले होते. शिवाय, पालकांची परवानगीसुद्धा घेण्यात आली नव्हती. यावर पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आमच्या परवानगीशिवाय शाळा पत्र लिहिण्यास कसे काय सांगू शकते ?, असा प्रश्न पालकांनी विचारला आहे.

दरम्यान, हा वाद वाढल्यानंतर शाळा प्रशासनाने माफी मागितली आहे. गैरसमजातून हा प्रकार घडल्याची सारसासारव शाळेने केली आहे. यानंतर शाळेने विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलेली पत्र विद्यार्थ्यांना परत केली आहेत. दरम्यान, या शाळेचे मालक आणि विश्वस्त जिनेश परास्रम यांनी यावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली असून काही शिक्षकांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला या पत्रांची कोणतीही कल्पना नव्हती. आम्ही पालकांना ही पत्रे परत केली आहेत. काही पालकांनी ती पत्रे फाडून देखील टाकली, असे परास्रम यांनी म्हटले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/