हिंदू देवता अन् HM शाह यांच्यावर टीका करणार्‍या गुजरातच्या कॉमेडियनसह चौघांना अटक

गुजरात : वृत्तसंस्था – हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवणे तसेच गोध्रा हत्याकांड प्रकरणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल अभद्र भाषेत टीका केल्या प्रकरणी स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याच्यासह चार जणांना इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. मुनव्वर फारुकी हे मुळचे गुजरातच्या जुनागडचे रहिवासी आहेत.

इंदूर येथे नववर्षानिमित्त ‘कॉमेडी शो’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फारूकी याने हिंदू देवता आणि शहा यांच्याविषयी अभद्र भाषेत टीका केल्याचा आरोप स्थानिक भाजप आमदार पुत्र एकलव्य गौर याने केला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल केली असता, त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी फारुकी आणि त्याच्यासह अन्य चौघांना अटक केली आहे.

काय प्रकरण काय ?
इंदूरमध्ये सेक्टर 56 येथील एका कॅफेमध्ये शुक्रवारी नववर्षाच्या स्वागतासाठी ‘कॉमेडी शो’चे आयोजन केले होते. कार्यक्रमाला भाजपच्या स्थानिक आमदार मालिनी लक्ष्मणसिंह गौर यांचा मुलगा एकलव्य सिंह गौर (36) आपल्या मित्रांसह उपस्थित होता. कार्यक्रमात केल्या गेलेल्या काही टिप्पणींवर एकलव्य याने आक्षेप घेतला आणि कार्यक्रम थांबवला. त्यानंतर कार्यक्रमाच्या व्हिडिओ फुटेजसह एकलव्य यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. व्हिडिओ फुटेजच्या आधारावर पोलिसांनी फारुकी आणि त्यांच्यासोबतच्या चार इतर लोकांविरोधात तक्रारीची नोंद केली आहे.

मी आणि माझे काही मित्र तिकीट खरेदी करुन या कार्यक्रमाला उपस्थित होतो. कार्यक्रमाला फारुकी हे प्रमुख कॉमेडियन म्हणून उपस्थित होते. यावेळी फारुकी यांनी अभद्र टिप्पणी करत हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवली. त्यानंतर गोध्रा हत्याकांड प्रकरणावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला असे एकलव्य गौर यांनी म्हटले आहे. यासोबतच इतर गोष्टींवरुनही या कार्यक्रमात चुकीच्या गोष्टींवर भाष्य सुरूच होते. याचे व्हिडिओ चित्रीकरण करुन आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतल्याचे ते पुढे म्हणाले.

कोरोना काळात प्रशासनाची परवानगी न घेता या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचाही आरोप एकलव्य गौर यांनी केला आहे. कार्यक्रमात कोरोना संबधीचे नियम धाब्यवर बसवण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचेही उल्लंघन केल्याचेही एकलव्य यांनी म्हटले आहे.