वाळूचा डंपर झोपडीत घुसल्याने 13 जणांचा जागीच मृत्यु, झोपेत असतानाच काळाची झडप

सुरत ( Surat ) : सुरतजवळील ( Surat ) कोसम्बा या गावात वाळू वाहून नेणारा डंपर झोपडीत शिरल्याने १३ मजूर जागीच ठार झाले. या अपघातात ११ जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे घडली.

सुरतपासून सुमारे ४२ किमीवर कोसम्बा हे गाव आहे़. या गावात एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामावर कामासाठी राजस्थानमधून कामगार आले आहेत. मुलाबाळासह २२ जण एका झोपडीत रहात होते. रात्री सर्व जण झोपले होते. त्यावेळी वाळू वाहून नेणार्‍या एका डंपरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि डंपर रस्ता सोडून थेट कडेला असलेल्या झोपडीत शिरला. त्यात डंपरच्या खाली सापडून १३ जणांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी ११ जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जखमींमध्ये काही मुलांचाही समावेश आहे. अपघातानंतर डंपर चालक पळून गेला आहे.