‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा बनवणार गुजरात सरकार; मुख्यमंत्री रुपाणी यांची घोषणा

गांधीनगर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशनंतर आता गुजरात राज्यातही ‘लव्ह जिहाद’ कायदा करण्याची तयारी सुरु आहे. याबाबतची माहिती स्वत: मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली आहे. विधानसभेच्या अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधात कडक विधेयक आणले जाणार आहे. त्यामुळे जबरदस्ती धर्मांतरण प्रकरणे रोखण्यासाठी मदत मिळेल.

मुख्यमंत्री रुपाणी यांनी सांगितले, की विधानसभेच अधिवेशन सुरु होत आहे. त्यामध्ये सरकार ‘लव्ह जिहाद’विरोधात विधेयक आणणार आहे. संपूर्ण राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधात मोहीम सुरु केली जाणार आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यात पहिल्यापासूनच धर्मांतरण विरोधी कायदा तयार झाला आहे. यामध्ये फसवून किंवा जबरदस्तीने धर्म परिवर्तन करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाते. उत्तर प्रदेशात या कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखलही झाले आहेत. आज हे विधेयक उत्तर प्रदेश विधानसभेत पास झाले. या विधेयकानुसार, ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

कर्नाटक, हरियाणातही होणार कायदा ?
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आहे. त्यानंतर कर्नाटक आणि हरियाणा या राज्यातही हा कायदा लागू करण्याचा विचार केला जात आहे. तर गुजरातमध्येही हा कायदा तयार करण्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे.