खळबळजनक ! बलात्काराच्या आरोपीकडून 35 लाखाची लाच घेणाऱ्या महिला PSI ला अटक

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरातमधील अहमदाबादमध्ये बलात्काराच्या आरोपीकडून 35 लाखाची लाच मागितल्या प्रकरणी एका महिला पोलीस उपनिरीक्षकला (PSI) अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षक महिलेला शनिवारी सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. श्वेता जडेजा असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. त्या अहमदाबादच्या पश्चिमच्या महिला पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. बलात्काराच्या आरोपीकडून 35 लाख रुपये घेतल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एफआयआर नुसार अहमदाबादच्या एका खासगी कंपनीत दोन महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या व्यस्थापकीय संचालकाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या घटनेच्या तपासादरम्यान श्वेता जडेजा यांनी आरोपी व्यवस्थापकीय संचालक केनल शाह यांच्याकडे कठोर कारवाई न करण्यासाठी 35 लाख रुपयाची लाच मागितली. श्वेता जडेजाने केनल शहाचा भाऊ भावेशकडे 35 लाखाची लाच मागितली. दोघांमध्ये 20 लाख रुपये देण्याचे ठरले होते.

यानंतर श्वेता यांनी 20 लाख रुपये एका तिसऱ्या व्यक्तीकडून स्विकारले. पण त्यानंतर त्यांनी अजून 15 लाख रुपयाची मागणी केली. 15 लाखाची मागणी केल्यानंतर 27 जून रोजी केनल शाह यांनी क्राईम ब्रांचमध्ये संपर्क साधून जडेजा यांची तक्रार केली. शनिवारी पोलिसांनी जडेजा यांना कोर्टासमोर हजर करत सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.