108 Ambulance उशीरा आल्याने मुख्यमंत्र्यांच्या भावाचा मृत्यू

राजकोट : वृत्तसंस्था – सरकारी कामाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वांना बसतो. सर्व सामान्य माणूस साध्यासाध्या कामांसाठी मेटाकुटीला येत असतो. त्यामुळे कोणतेही काम योग्य पद्धतीने झाले नाही तर सरकारी पद्धतीचे काम म्हटले जाते. या सरकारी सिस्टीमचा फटका खुद्द गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या भावाला बसला आहे. वेळेवर अ‍ॅम्बुलन्स आली नसल्याने त्यांच्या मावस भावाचा मृत्यू झाला. त्यामुळे अ‍ॅम्बुलन्स सेवेच्या सरकारी दाव्याची हवा निघाली आहे.

108 नंबर वर फोन केल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची योजना देशातील सर्व राज्यांत राबवली जाते. सामान्य नागरिकांसाठी ही महत्त्वाची आणि गरजेची सेवा आहे. या सेवेचा लाभ होत असल्याचा दावा गुजरात सरकार नेहमी करत असते. मात्र, आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या भावाला याचा फटका बसल्याने सरकारी दाव्यांची हवा निघाली आहे. अनिल संघवी हे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे मावस भाऊ राजकोट येथे राहतात. 4 ऑक्टोबरला त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांचा मुलगा गौरांग याने 108 नंबरला फोन करून रुग्णवाहिका बोलावली. मात्र, वारंवार फोन करून देखील रुग्णवाहिका आली नाही.

रुग्णवाहिका येण्यास 45 मिनिटं उशीर झाला. तोपर्यंत अनिल संघवी यांचा त्रास वाढला. रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णाला लवकरात लवकर आणलं असतं तर कदाचित ते वाचू शकले असते असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकालाच 108 चा फटका बसल्याने प्रशासन हादरुन गेले आहे. मुख्यमंत्री रुपानी यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like