‘पंतप्रधान मोदींचे चीन दौरे चायनीज रेसिपी शिकण्यासाठी होते का ?’

मुंबई : पोलीसनाना ऑनलाईन – पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारा आणि पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला जागितक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनने खोडा घातला. चीनने चौथ्यांदा या गोष्टीस नकार दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे आणि मसूदला दहशतवादी घोषित करण्यास नकार दिला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत निशाणा साधला आहे. पंतप्रधानांचे चीन दौरे हे केवळ ढोकळा आणि चायनीज रेसिपीज शिकण्यासाठी होते का ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात इतक्या वेळा चीनचा दौरा केला. चीनचे राष्ट्राध्यक्षदेखील खास गुजरात भेटीला आले होते. तरीदेखील चीनने मसूद अजहर प्रकरणात भारताविरुद्ध भूमिका घेतली. मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे काय झाले ? हे दौरे ढोकळा आणि चायनीज रेसिपीज शिकण्यासाठी होते का ?” असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे. केला आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केले आहे आणि मोदींवर निशाणा साधला आहे.

पुलवामा येथे आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. यानंतर, फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन या देशांनी भारताची बाजू घेतली. २७ फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव मांडला होता. समितीच्या सदस्यांना या प्रस्तावास आक्षेप घेण्याबाबत १० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही कालमर्यादा बुधवारी संपली. दरम्यान समितीतील सदस्यांच्या मताच्या आधारे यावर निर्णय घेण्यात आला. त्यात अपेक्षेनुसार चीनने या प्रस्तावासंदर्भात नकाराधिकार वापरला. चीनने या प्रस्तावाला विरोध करताना पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

यापूर्वीही चीनने अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर २००९, २०१६, २०१७ असा तीनदा नकाराधिकार वापरला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नकाराधिकार वापरण्याची चीनची ही चौथी वेळ आहे. चीन हा सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असून पाकिस्तानसोबत चीनचे चांगले संबंध आहे.