PM नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं 92 व्या वर्षी निधन

अहमदाबाद : वृत्तसंस्था –    गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल (Keshubhai Patel) यांचं निधन झालं आहे. ते 92 वर्षांचे होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी त्यांना श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्यानं भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मोठा धक्का बसला आहे.

केशुभाई पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय होते. पीएम मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केशुभाई यांनी 2 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. 1995 मध्ये त्यांनी प्रथम गुजराच्या मुख्यमंत्रिपदाची सुत्रे हाती घेतली होती. त्यानंतर त्यांनी 1998 ते 2001 या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवलं. राज्यात त्यांनी 6 वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या. केशुभाई पटेल यांनी 2012 साली भाजप सोडून गुजरात परिवर्तन पार्टी (Gujarat Parivartan Party) हा त्यांचा नवा पक्ष स्थापन केला होता. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत ते विसावदार मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु नंतर प्रकृतीमुळं 2014 रोजी त्यांनी राजीनामा दिला होता.

पटेल यांच्या निधनाबद्दल सूरतच्या भाजप खासदार दर्शना जारदोश (Darshana Jardosh) यांनी लिहिलं की, गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:ख झालं. त्यांचं कौशल्य, पक्षनिष्ठा आणि गुजरातच्या राजकारणात त्यांचं असलेलं स्थान खूप मोलाचं होतं.”

पीएम मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी पटेल यांच्या जाण्यानं शोक व्यक्त केला आहे.

You might also like