‘नाथाभाऊंनी वडिलांसारखं प्रेम दिलं, पण मुलगा मानलं नाही म्हणून ही वेळ आली’

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – नाथाभाऊंनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं, मात्र त्यांनी मला कधी मुलगा मानलं नाही, त्यामुळे ही वाईट वेळ आली, अशा कानपिचक्या शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावल्या आहेत. भुसावळमध्ये गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर बोलताना त्यांनी राजकीय टोलेबाजी केली.

भाजपच्या राज्यातील नेतृत्वाकडून आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या आरोपावरून गुलाबराव पाटील यांनी कानपीचक्या काढल्या. ते म्हणाले, वडिलांसारखं प्रेम केलं, मात्र मुलगा कधी मानलं नाही. त्यांनी मुलगा म्हणून माझा वापर केला असता तर मी पक्का माणूस आहे. कधीही पाठिमाग हटलो नसतो.

नाथाभाऊंनी सोबत ठेवलेल्या लोकांचा रक्तगट कधीच तपासला नाही. त्यांनी रक्तगट तपासून माणसं ठेवली असती तर गुलाबराव पाटील सारखा सच्चा माणूस कधीही तुटला नसता. तुटू शकणारही नाही. रक्षा खडसे लोकसभेला उभ्या राहिल्या. तेव्हा मी त्यांच्या प्रचाराला गेलो होते. माझी मागची दुश्मनी काढली नाही. मला या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पहायचं होतं असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

राजकारणात कधीच कोणी कोणाचा दुश्मन नसतो. कधी वाटलं होतं का तीन लोकांच सरकार राज्यात बनेल. असा प्रश्न विचारत राजकारणात परखड दुश्मनी नको, विचारांची लढाई आहे. ज्या दिवशी विचारांची लढाई सोडून निवडणूक लागेल. त्यावेळी मी तुमच्याविरुद्ध प्रचाराला येईन. मी प्रचारला येईन, मी पुन्हा येईन, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.