‘धनंजय मुंडेंचे राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, ते निर्दोष सुटणार’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन –  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपवरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपकडून मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान धनंजय मुंडे हे नक्की यातून निर्दोष सुटतील. त्यांच राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

गुलाबराव पाटील जळगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंडे यांनी यापूर्वीच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपल्या अपत्यांबाबतही माहिती उघड केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपात काही तथ्य असेल असे वाटत नाही, यातून ते नक्कीच निर्दोष सुटतील असे गुलाबराव पाटील म्हणाले.

मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांना अभय देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ते म्हणाले की, आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा केली. त्याचबरोबर त्या महिलेवरही ब्लॅकमेलिंगचे आरोप आहेत. वेगळ्या विचारांचे आणि वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबाबत बोलत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावे असे आपण सुचविले आहे. चौकशी पूर्ण झाल्यावरच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.