दुबईत रंगणार ‘गल्फ सिने फेस्ट-2021 सोहळा’ ! आखाती देशातील मराठी प्रेक्षकांना नववर्षाची भेट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना महामारीमुळे गेले आठ महिने कलाविश्वातील कमी झालेली झगमगाट आता पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता 5 जी इंटर नॅशनलच्या वतीने सातासमुद्रापार ‘गल्फ सिने फेस्ट 2021-चे आयोजन करत (gulf-cine-fest-2021-be-held-dubai) पुन्हा एकदा मनोरंजनाच्या नव्या आरंभासाठी मराठी चित्रपटसृष्टी सज्ज झाली आहे. या फेस्टच्या माध्यमातून प्रथमच परदेशामध्ये 20 ते 23 जानेवारीदरम्यान मराठी चित्रपटांचा प्रीमिअर सोहळा रंगणार आहे. उत्तम आशय विषयांच्या चित्रपटांची मेजवानी ही आखाती देशातील मराठी प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाची भेट ठरणार आहे.

गल्फ सिने फेस्ट- 2021 ची संकल्पना खूप आगळीवेगळी असून, यात बऱ्याच नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश केला आहे. सोहळ्यामध्ये 2021 या वर्षामधील बहुचर्चित पाच आगामी मराठी चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. सोबत चित्रपटांची टीमही यावेळी उपस्थित राहणार असून, ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे आगामी मराठी चित्रपटांचे ट्रेलर आणि टीझरही सोहळ्यात दाखवले जाणार आहेत. तीन दिवसांच्या या रंजक सोहळ्यात चित्रपटाच्या मेजवानीसह रंजक कार्यक्रमाची रेलचेल प्रेक्षकांसाठी असणार आहे.