भिवंडीत किरकोळ कारणावरून एकावर बेछुट गोळीबार

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन – क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणावर गाडी मागे घेण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आला. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीवर , पोटावर व हातावर तीन गोळ्या लागल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. भिवंडीतील पायगावात शनिवारी (दि. 23) सायंकाळी ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला आहे का त्यानुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

प्रफुल तांगडी असे या गोळीबारात जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायगाव येथे फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. मात्र या क्रिकेट ग्राऊंडकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने जखमी व हल्लेखोर यांच्या गाड्या समोरासमोर आल्या असता गाड्या मागे घेण्यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. आधी तू गाडी मागे घे , आधी तू गाडी मागे घे अशी जोरदार बाचाबाची झाल्यांनतर दोघात हाणामारी झाली. त्यानंतर एका तरुणाने प्रफुलवर रिव्हॉल्वरने पाच राउंड फायर केले . या गोळीबारात प्रफुल गंभीर जखमी झाला असून प्रकृति चिंताजनक असल्याचे समजते. त्याला उपचारासाठी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर गोळीबार करणारा हल्लाखोर तरुण फरार झाला असून भिवंडी तालुका पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली आहे .