गुरु परमात्मा परशू ! जाणून घ्या गुरुपूजन, गुरुमहती आणि गुरुमहत्त्व

पुणे : पोलीनामा ऑनलाइन – गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: | गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:|| आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊ जाणारी वंदनीय व्यक्ती. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. धर्मशास्त्र, नितिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यासांनी लिहला.

जगाला प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. गुरुपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. भारतात गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. यंदाच्या गुरुपौर्णिमेचे विशेष म्हणजे याच दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण लागणारे 2020 हे सलग तिसरे वर्ष आहे. यानिमित्ताने गुरुपौर्णिमेचे महत्त्व यांबाबत जाणून घेऊयात.

कधी आहे गुरुपौर्णिमा ?

शनिवारी (दि.4) सकाळी 11 वाजून 33 मिनिटांनी आषाढ पौर्णिमा सुरु होणार असून, रविवार (दि.5) सकाळी 10 वाजून 13 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. भारतीय पंचांगानुसार, सुर्योदयाची तिथी मानली जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमा ही 5 जुलै 2020 रोजी साजरी केली जाणार आहे. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा करण्याची परंपरा आहे. पूर्वी गुरुकूल पद्धत रुढ होती. गुरुकडून ज्ञानप्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे, असे सांगितले जाते.

गुरुपौर्णिमेचा इतिहास
भारतामध्ये पूराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरूकडे आश्रमात राहत होते. ज्ञानसंपदनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही सुरु आहे. तिथीनुसार आषाढ पौर्णिमेला महर्षी व्यासांचा जन्म झाल्याची मान्यता असल्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यासपूजन केले जाते.

आई पहिला गुरू
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा पहिला गुरू त्याची आई असते. अगदी चालण्या-बोलण्यापासून ते संस्कार करेपर्यंत अनेक गोष्टी आई शिकवत असते. म्हणूनच ‘आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सौख्याचा सागरु, आई माझी’, असे म्हटले जाते. आईसोबत वडील देखील अनेक गोष्टी शिकवत असतात. त्यामुळे ‘मातृदेवो भव:, पितृदेवो भव:’ असेही म्हटले जाते. घरातून बाहेर पडल्यानंतर शिक्षक, वडील मंडळी, मित्रमंडळी, तज्ज्ञ मंडळी असे अनेक जण आपल्याला गुरु, मार्गदर्शक म्हणून लाभतात.

गुरूचा नेमका अर्थ काय ?
कालीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले की, ‘ग’ कार म्हणजे सिद्ध होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रुप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्याचे त्रिगुणात्मक रुप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्त्व आहे, ते जाणून घेण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो आणि गुरु स्वत: प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो.

भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्ण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु शिष्यांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले. तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करत होते. त्यांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला नेहमीच पूजनीय मानले जाते. आयुष्यात चांगला गुरु मिळणे भाग्याचे लक्षण समजले जाते.

गुरुपूजन
गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे. गुरुपूजन म्हणजे गुरुंची पाद्यपूजा करणे. मात्र, गुरुपूजन म्हणजे केवळ गुरुची पाद्यपूजा करणे अथवा गुरुला वाकून नमस्कार करणे, असे मूळीच नाही. खऱ्या गुरुला आशा दिखाव्यांची गरज नसते. गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरुने दिलेले ज्ञान आत्मसात करणे. गुरुंकडून मिळवलेले ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणे. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरे गुरुपूजन. अशा प्रकारच्या गुरूपूजनातून गुरुला खरी गुरुदक्षिणा मिळते. कारण शिष्य प्रगती कोरतो तेव्हा गुरूलाच अत्यानंद होतो. गुरुसाठी तो एक सन्मानच असतो.

गुरु-शिष्याचे नाते
गुरुचे कार्य महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या चांगल्याचा विचार करून त्यांना आपल्या जवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरुचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरुची भावना ही अहंकाराची नसावी. गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते, तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरुला आनंद आणि समाधान झाले, तरच तो खरा गुरु जाणावा. गुरुकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्विकारतो, त्या शिष्याला गुरुकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल, तर गुरुकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणे गुरुला कठीण जाते. कारण यामध्ये शिष्याचा अहंकारपणा ज्ञानप्राप्तीमध्ये अडथळा निर्माण करतो. यासाठी शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणे गरजेचे आहे.

जीवनात गुरु का आवश्यक आहे ?
गुरु त्यांच्याजवळचे ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असताना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर सोडवतात येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते. जीवनात गुरुशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरु असोत, शिष्याला गुरुप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे. यासाठीच गुरुपौर्णिमेचे महत्व प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे.