…म्हणून रेप केसमध्ये शिक्षा भोगणार्‍या राम रहिमला मिळाला ‘पॅरोल’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – हरियाणाच्या रोहतकमधील सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत असलेला सिरसा डेरा प्रमुख गुरमीत राम रहिम याला 48 तासांचा पॅरोल मंजूर झाला आहे. आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास राम रहिम कारागृहातून बाहेर पडला. तो त्याच्या आईला भेटण्यासाठी गुरुग्राम येथे गेला आहे.

बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी गुरमीत राम रहिम कारागृहात शिक्षा भोगत आहे. मात्र, त्याच्या आईची प्रकृती बिघडल्याने तिला मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याच्या आईवर उपचार सुरु आहेत. आईला भेटण्यासाठी त्याने पॅरोलसाठी अर्ज केला होता. गुरुग्राम पोलिसांनी केलेल्या शिफारसीनंतर सुनारिया कारागृह प्रशासनाने पॅरोलला मंजूरी देत 48 तासांसाठी गुरुग्राम येथे पाठवण्यात आले आहे. सध्या तो त्याच्या आईसोबत आहे.

21 दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज

गुरमीत राम रहिम याने 21 दिवसांच्या इमर्जन्सी पॅरोलसाठी अर्ज केला होता. त्यावरून वादंग निर्माण झाला होता. राम रहिम याला पॅरोल देऊ नये, यासाठी हरियाणाच्या शिख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने राज्य सरकारला विनंती केली होती. राम रहिम याला पॅरोल देणे धोकादायक ठरू शकते, असे त्यांनी म्हटले होते.

राम रहिमचीही तब्येत बिघडली

राम रहिमची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्याला रोहतक PGI मध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तसेच स्पेशल वार्डमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती. राम रहिम ज्या ठिकाणी बंद आहे तिथं इतर काही कैद्यांना कोरोना झाला आहे.