13 महिन्याची जेलवारी ! पण, त्यानं बनवलं जबरदस्त सॉफ्टवेअर

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या क्षेत्राची आवड असते. आणि त्या क्षेत्रात प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या सर्व गोष्टी शक्य करून दाखवत असतो. अशीच एक घटना हरियाणामधील गुरुरुग्राममधील तुरूंगातुन समोर आली आहे. एका कैद्याने १३ महिन्याच्या तुरुंगवासादरम्यान सॉफ्टवेअर तयार केलं आहे. हे सॉफ्टवेअर तुरुंगाचं व्यवस्थापन सुधारण्यासंदर्भातील आहे. अमित मिश्रा असं या कैद्याचं नाव आहे. तुरुंगात असतानाही एका कैद्यांन तयार केलेलं सॉफ्टवेअर सर्वोच्च न्यायालय आणि इतर वकिलांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. यासंदर्भात हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले आहे. अमितचे भरभरून कौतुक केलं जात आहे.

अमित मिश्रा हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी अमितला काही दिवसापूर्वी अटक करण्यात अली होती. त्यानंतर त्याला हरियाणामधील गुरुरुग्राममधील तुरुंगामध्ये १३ महिन्यांसाठी ठेवण्यात आलं होतं. याच कालावधीत त्याने हे सॉफ्टवेअर तयार केलं. वर्षानंतर अमितची तुरुंगातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र तुरुंगात राहून अमितने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमुळे आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तुरुंगांमधील सुधारणांसाठी हे सॉफ्टवेअर ठरू शकतं फायदेशीर
तुरुंगांमधील सुधारणांसाठी बनवलेल्या सॉफ्टवेअरमुळे सोमवारी अमितचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केलं आहे. सर्व राज्यांनी अमितने बनवलेलं सॉफ्टवेअर पाहावं असा सल्ला न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने दिला आहे. हे सॉफ्टवेअर तुरुंगांमधील सुधारणांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतं. त्यामुळेच फक्त हरियाणाचा नाही तर देशातील इतर राज्यांनाही या सॉफ्टवेअरचा वापर शक्य आहे का यासंदर्भातील विचार करावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असता ती व्यक्ती मरेपर्यंत ती व्यक्ती तुरुंगामध्येच असते. मात्र तुरुंगामधील वागणुकीच्या आधारे राज्य सरकार आणि तुरुंग प्रशासनाला अशा व्यक्तींना १४ वर्षांनंतर सोडून देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

अनेक राज्यांमध्ये या सॉफ्टवेअरचा होतोय वापर
अमितने बनवलेल्या सॉफ्टवेअरला “फिनिक्स” असं नाव देण्यात आलं आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने कैदी तुरुंगामध्ये कसा राहतो, काय करतो, इतरांशी कसा वागतो या सर्व गोष्टींची नोंद ठेवता येणार आहे. सध्या हे सॉफ्टवेअर हरियाणामधील १९ जिल्ह्यांमध्ये वापरलं जात आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील ३८, उत्तर प्रदेशमधील ३१ आणि हिमाचल प्रदेशमधील १३ जिल्ह्यांमध्ये या सॉफ्टवेअरची मदत तुरुंग प्रशासनाकडून घेतील जात असल्याची माहिती अमितने दिली आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.