Lockdown : अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तेलंगणा ते पाटस गुटख्याची तस्करी, पोलिसांकडून 22 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – गुटखा बंदी असताना देखील संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा देण्याच्या नावाखाली आयशर टेम्पोत तेलंगणा येथून मुंबईमार्गे जिल्ह्यात आण्यात आलेला तबल 22 लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे. बारामती गुन्हे शाखेच्या पथकाने हा टेम्पो पकडला असून, एकाला अटक केली आहे. दरम्यान राज्यासह जिल्हा बंदी असताना टेम्पो चेक न होताच कसा आला असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

मानसिंग खुदहरणसिंग कुशवाहा (वय 50, रा. गाझीपुर उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर एकजण पसार झाला आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात गुटखा बंदी आहे. परंतु इतर राज्यातून गुटखा आणला जातो आणि त्याची बेकायदेशीर विक्री केली जाते. दरम्यान देशात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर राज्यात संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. वाहतूक देखील बंद केली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देण्याच्या नावाखाली अनेकजण आपले गोरखं धंदे करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग सुरू आहे.

यावेळी आयशर टेम्पो संशय आला. त्यामुळे पोलिसांनी पाट्स टोलनाक्या परियंत टेम्पोचा पाठलाग केला. तेथे टेम्पो अडविला असता चालकाकडे चौकशी केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेेेच गाडीत बिस्किटे आहेत असे सांगितले. पथकाने टेम्पोची झडती घेतली. कोणाला लक्षात येऊ नये अश्या पद्धतीने आतील बाजूस गुटख्याची पोती भरून मागचे बाजूला बिस्कीट चे बॉक्स भरलेले मिळून आले. तेलंगणा येथील सिकंदराबाद येथून पुण्याच्या दिशेने टेम्पो निघाला होता. टेम्पोच्या काचेवर “अत्यावश्यक सेवा” असा छापील बोर्ड लावण्यात आला होता. ते 540 किलोमीटर प्रवास करून आले आहेत.

पोलिसांनी टेम्पोतून 22 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा सागर SGR – 2000 नावाचा गुटखा आणि 10 लाखाचा टेम्पो असा 32 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्याखालील नियम 2011 अंतर्गत कलम 26(1) 26(2), 27(1)(2)(3),30(2)(a) भा द वि 420, 34, 177, 269, 270, 272, 273,188 साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलम 2,3,4 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बारामती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि कर्मचारी सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक रमेश मोरे यांच्या पथकाने केली आहे.