TV रिपोर्टरचा अपघातात मृत्यू, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या भाजप नेत्याचा केला होता ‘पर्दाफाश’

गुवाहाटी : वृतसंस्था –   आसाममधील ‘डेली टाइम’ या स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा एका वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. तीन सुकिया जिल्ह्यात बुधवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, हा अपघात नसून पत्रकाराची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकासह दोघांना अटक केली आहे.
पराग भुयान(parag-bhuyan)असे अपघातात ठार झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. ते डेली टाइम या वाहिनीचे काकोपथारचे वरिष्ठ वार्ताहर होते. आपल्या भागातील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कामे उघडीस आणली होती, त्यामुळे त्याची हत्या केली असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री त्यांच्या घराजवळ राष्ट्रीय महामार्ग 15 वर एका वाहनाने धडक दिली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, गुरुवारी त्यांचे निधन झाले. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहनाचा क्रमांक मिळाला आहे. तसेच फरार असलेल्या ड्रायव्हरसह दोघांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात आसाम पोलिसांनी अरुणाचल पोलिसांना सतर्क केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पराग भुयान यांची हत्याच (rahul-gandhi-claim-murder)झाल्याचे ट्विट केले आहे. राहुल गांधी ट्विट करत, भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार उघड केल्यामुळे आसाममधील या पत्रकाराची हत्या झाली आहे. आसाम, मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यांमध्ये खऱ्या पत्रकारांचा आवाज दाबला जात आहे आणि तमाशा करणाऱ्यांना सुरक्षा दिली जात असल्याचे म्हटले आहे.

वाहन महिलेच्या नावावर  पोलिसांनी सांगितले की हे वाहन अरुणाचल प्रदेशातील एका महिलेचे असून तिचा मुलगा चहाची पाने वाहतुकीसाठी हे वाहन वापरतो. टीव्ही वाहिनीचे मुख्य संपादक नितुमोनी सैकिया म्हणाले की, पोलिसांची ही मनोवृत्ती शंका उपस्थित करत आहे. त्यांनी असेही म्हटले की पराग यांचा संशयास्पद खूनच झाला आहे. संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सैकिया यांनी केली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भुयान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.