पुण्यातील जिम्नॅशिमम्स, फिटनेस सेंटर्स खुली करावीत : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गेली १९५ दिवस बंद असलेली जिम्नॅशियम्स आणि फिटनेस सेंटर्स खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

शहरातील जिम्नॅशिअम्स आणि फिटनेस सेंटर्स तीस टक्के लोकसंख्येच्या जीवनशैलीशी जोडली गेली आहेत. जिम आणि फिटनेस सेंटर्सचे चालक, ट्रेनर्स आणि सभासद मुळातच आरोग्याविषयी जागरूक असतात. सोशल डिस्टन्स आदी नियम जिम्समध्ये कसोशीने पाळले जातात. जिम आणि फिटनेस सेंटर्समध्ये शास्त्रशुध्द व्यायाम करून घेतला जातो, आहाराविषयी मार्गदर्शन केले जाते. सध्याच्या कोरोना संसर्गाला प्रतिकारासाठी उत्तम आरोग्य राखणे ही गरज आहे. सलग १९५ दिवस जिम्स, फिटनेस सेंटर्स बंद राहिल्याने आरोग्याचे प्रश्न साहजिकच उभे राहिले आहेत. मधुमेह, रक्तदाब, स्थूलता या विकारांवरवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची गरज आहे आणि त्यादृष्टीनेही जिम्स, फिटनेस सेंटर्स खुली करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे, असे आमदार शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

युनायटेड हेल्थ फिटनेस फेडरेशन ( पुणे ) या संस्थेने राज्य सरकारच्या नियमाला अधिन राहून जिम, फिटनेस सेंटर्स चालविली जातील अशी हमी दिली आहे. याचीही दखल राज्य सरकारने घ्यावी असे आमदार शिरोळे यांनी पत्रात स्पष्ट केले असून महाराष्ट्रा व्यतिरिक्त अन्य राज्यात जिम्नॅशियम, फिटनेस सेंटर्स खुली करण्यात आल्याचे मुख्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.