ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन
जिवलग मित्राचा एक व्हॉटसअप आला़ त्यात तातडीने एकाला मदत हवी असून त्याच्या खात्यात पैसे ट्रॉन्सफर करायला सांगितले जात. आता मित्राच्या नंबरवरुन मेसेज असल्याने त्याने सांगितलेल्या बँक खात्यात १ लाख ८६ हजार रुपये ट्रॉन्सफर केले़. त्यानंतर काही दिवसांनी मित्राची भेट झाल्यावर त्याने असा काही मेसेजच पाठविला नसून त्याचा मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितल्यावर फसवणूकीचा हा नवा प्रकार उघड झाला आहे़.
ठाण्यातील एका चार्टर्ड अकाउंटंटच्या मित्राचा मोबाइल फोन काही दिवसांपूर्वी चोरी गेला. हा मोबाइल एका हॅकरने तपासला. त्यामध्ये चार्टर्ड अकाऊंटंटबरोबर मित्राने व्हॉट्सअॅपवर केलेले चॅटिंगही हॅकरला दिसले. त्यावरून दोघांमधील आर्थिक व्यवहार हॅकरला समजले. त्याने चार्टर्ड अकाउंटंटच्या मित्राच्या नंबरचे डुप्लिकेट सीमकार्ड घेऊन त्यांचा ई-मेलही हॅक केला. त्याआधारे त्याने चार्टर्ड अकाउंटंटशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला.
फिरोज अख्तर नावाच्या एका मित्राच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यात १ लाख ८६ हजार रुपये जमा करण्याची विनंती त्याने चार्टर्ड अकाउंटंटला केली. चार्टर्ड अकाउंटंटला त्यांच्या मित्राचा मोबाइल चोरी गेल्याचे माहीतच नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या जवळच्याच मित्राने हे काम सांगितले असल्याचे समजून रक्कम जमा केली. काही दिवसांनी त्यांच्या मित्राची भेट झाली, तेव्हा त्यांनी मोबाइल फोन चोरीस गेल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले़ त्याने राबोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़