…तर धनंजय मुंडेंचा तात्काळ राजीनामा घेतला असता, राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर

मुंबई/ चिपळूण : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( dhananjay munde ) यांच्यावर गायिका रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंडे प्रकरणी भाजपाने राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यात आता राज्यात सत्तेतील सहकारी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला मुंडे प्रकरणात घरचा अहेर दिला आहे. मुंडे      (dhananjay munde ) काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता, असे विधान माजी खासदार आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केले आहे. कोकणात चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले आहे.

मुंडे यांच्याविरोधात आरोप झाल्यानंतर राज्यातील राजकारण पेटल आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला आघाडी सोमवार (दि. 18) पासून राज्यभरात आंदोलन करणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेत्यांसह, महाविकास आघाडीच्या काही नेते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत आहे. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांच्यावर मोठ राजकीय संकट आले होते. परंतु भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने त्यांना अप्रत्यक्षरित्या मदत झाल्याने संपूर्ण घडामोडीला उलट कलाटणी मिळाली आहे. हेगडे यांनी तक्रारदार मुलीवर गंभीर आरोप करत 2010 पासून ही महिला सतत माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्नात होती, असे सांगितले. हेगडे आणि मनिष धुरी यांनी रेणू शर्मावर केलेल्या आरोपामुळे मुंडे यांच्याविरोधात असलेले वातावरण त्यांच्या बाजूने वळले आहे.

दुसरीकडे मात्र या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली आहे.